Pages

28 February 2015

काट्यालाही जपणारा प्रीतस्पर्श !!!!


प्रेम आणि मैत्री ह्या दोघांची तुलना नेहमी होत आली आहे पण खर तर प्रत्येक नात हे आपल्या ठिकाणी श्रेष्ठ असत. कुठलही नात असू दे ते टिकवून ठेवण्यासाठी एका गोष्टीची अत्यंत गरज असते ती म्हणजे क्षमाशील वृत्ती आणि मला वाटत ही गोष्ट जास्त करून जिथे प्रेम आहे तिथेच दिसून येते. अगदी मैत्रीचच उदाहरण घ्या. वाद भांडण ही होतच असतात परंतु जर मैत्री दृढ आणि प्रेमयुक्त असेल तर काहीही झाल तरी ती तुटत नाही पण मैत्रीत जर अहंकाराचा भाग अधिक असेल तर मैत्री तुटल्याशिवाय रहात नाही. प्रेमाच्या बाबतीतही हाच नियम लागू पडतो. जिथे नात्यात प्रेम अधिक आहे तिथे एकमेकांच्या चुकांना क्षमा करण्याची वृत्ती ही जास्त दिसून येते. काही काळाचा दुरावा जेव्हा मनात अस्वस्थता निर्माण करतो , कदाचित आपलंही काहीतरी चुकल असेल ह्याची जाणीव करून देतो आणि आपण चुका स्वीकारून ,सुधारून पुढे जाण्याचा निर्णय घेतो त्यावेळेस आपल्या अहंकारावर प्रेमाने मात केलेली असते हे मात्र खर. नाती तोडण हे जितक अहंकाराच काम आहे तितकच ते जोडून ठेवण्याच काम प्रेम स्वाभाविकपणे करते. जगातील कुठलच नात हे परिपूर्ण असू शकत नाही. दोन भिन्न प्रकृती आणि प्रवृत्ती एकत्रित आल्या की संघर्ष होतोच. नदीचे दोन प्रवाह जरी पाण्याचेच असले तरी जिथे संगम होतो तिथे थोडी खळखळ ही होतेच आणि नंतरच एक संथ असा प्रवाह सुरु होतो. तसच काहीस मैत्री आणि प्रेमाच्या बाबतीत घडत. जिथे मन जुळतात तिथे आधी थोडा बेबनाव ठरलेला असतो पण एकदा का व्यक्तीची ओळख पटली की मात्र आपल्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद आपोआप संयमित होत जातात. प्रेम ही एक शक्ती आहे जी नेहमीच व्यक्तीला आणि नात्याला सकारात्मकपणे बांधून ठेवते. जिथे प्रेमाला ओहोटी लागते तिथे कुठलेही बाह्य आकर्षण दोघांना जोडून ठेवू शकत नाही. अहंकार आणि बेबनावाची ठिणगी नात्याला पोळून टाकते तिथेच प्रेमाची हळुवार फुंकर त्याला शीतलतेचा स्पर्श देते नाही का ? 
 …मिनल सबनीस
 

No comments:

Post a Comment

Comment Here