"
ह्या मुलीला बघून ठेव नंतर सांगते " रुचीने सांगितल्यावर तिने दाखवलेल्या
मुलीला मी बघितलं .ती मुलगी ट्रेनमधून उतरल्यावर रुची सांगू लागली " you
know तिचा घटस्फोट झाला आहे पण बघून वाटत नाही ना ? कशी रहाते… नेहमी
हसतमुख असते बघून वाटत नाही अस काही घडल असेल. कशा असतात न बायका ? काहीच
कस वाटत नाही ? इतकी मोठी गोष्ट घडली तरी त्याच सोयर न सुतक . लोक काय
म्हणतील ह्याची पण काळजी नाही". खर सांगू मला रुचीच बोलण
अजिबात आवडलं नाही आणि मुळात मला ते पटल नाही आणि त्याही पेक्षा ह्या मागे
वेगळ कारण होत ते म्हणजे मी त्या मुलीला ओळखत होते. ज्या वेळेस तिच्या
आयुष्यात ही घटना घडत होती तेव्हा जुजबी ओळख असूनही ती माझ्याकडे मोकळी
झाली होती. झाल्या प्रकारात ती पूर्ण निर्दोष नव्हती तरी तिला खूप मोठी
शिक्षा मिळाली होती. त्या काळात ती प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रासाला
सामोरी जात होती अगदी आत्महत्येचा विचारही तिने बोलून दाखवला होता.लग्न
मोडू नये ह्यासाठी तिने नवस केले.पत्रिका दाखवून प्लीज काही उपाय आहे का ग ?
अस तिने विचारलं होत.तिची ती केविलवाणी अवस्था आणि आत्ताची ती खूप फरक
होता. पण मला स्वतःला ती आत्ता मनापासून आवडली होती.आयुष्यात एक घटना अशी
घडली म्हणून पूर्ण आयुष्य शुष्क घालवायच ते का ? आणि तोही असा निर्णय जो
लादला गेला आहे. खर तर स्त्री असो की पुरुष घटस्फोट झाला की समाजापासून
तुटत नाहीत तर समाज त्यांना आपल्यापासून तोडून टाकतो. कुठलीतरी भयानक घटना
घडली आहे त्यामुळे त्यांना आनंदी राहण्याचा अधिकार जणू नाकारला जातो
.कुणीही आपल्या आयुष्यात अशी घटना घडावी म्हणून प्रार्थना करत नाही. अनेकदा
एकाच्या अक्षम्य चुकीची शिक्षा ही दुसर्याला भोगावी लागते मग त्या
व्यक्तीने का बर स्वतःला शिक्षा करून घ्यायची ? प्रेमभंग होतात आणि नंतर
प्रत्येक जण दुसर्याशी लग्न करून मार्गी लागतो परंतु फक्त लग्नाला कायदेशीर
मान्यता असल्यामुळे त्या लोकांना अशा अपमानास्पद वागणुकीला सामोर जाव
लागत. कधी स्त्री तर कधी पुरुष मनात नसताना घटस्फोटाला तयार होतात कारण
दुसर्याची तडजोड करायची इच्छा आणि तयारी नसते मग आपण कशासाठी त्यांना दोष
द्यायचा. ज्याची अशा गोष्टीला तयारी नसते तो कुठल्या यातनां मधून जात असेल
ह्याची कल्पना आपण कशी करणार ? कुठल्याही समारंभात आपले मित्र असोत की
मैत्रिणी स्वतःच्या जोडीदाराबरोबर असताना ह्यांच्या मनातील एकटेपणा कुणी
समजून घेईल का ? लोक कुटुंबासोबत सण साजरे करत असताना ह्याच्या मनात असलेली
विषण्णता आपण कशी समजू शकणार ? अशा भावनिक निराशेतून जर कुणी पुन्हा
नव्याने उभ रहाण्याचा प्रयत्न करत असेल तर उलट अशा व्यक्तीच आपण कौतुक
करायला हव. त्यालाही हसण्याचा सुखाने जगण्याचा अधिकार आहे. जर आपण त्याच्या
दुखात त्याला सोबत करू शकत नसू तर त्याच्या सुखाच्या मार्गावर ताशेरे
ओढण्याचा समाजाला नक्कीच अधिकार नाही आहे.तस पण आजकाल सुखी संसार हा आजकाल
एक स्वप्नवत शब्द झालेला आहे. कितीसे खरे सुखी असत्तात ते त्याचेच ते
जाणोत. न आदर न प्रेम तरीही फक्त सोबत आहेत म्हणून संसारी. फक्त काहींच्या
वाट्याला ही अशी परवड येते म्हणून त्यांच्या दुखावरती आणि सुखावरती
बोलण्याचा अधिकार आपल्याला मिळाला अस आपल्याला वाटत. बहुतेक जण रुचीसारखाच
विचार करतात हे दुर्दैव आहे. त्याच्या जीवनाचा संघर्ष मग लढताना त्यांनी कस
लढायचं हे तेच ठरवणार अशा वेळेला आपण न्यायाधीश होऊ नये अस निदान मला तरी
वाटत. तुम्ही तुमच मत नक्की मांडा.
………मिनल सबनीस
No comments:
Post a Comment
Comment Here