"खरा
संघर्ष कधी असतो ?" अस कुणी विचारलं की अनेक उत्तर समोर येतात. शत्रूवर
मात करताना हे उत्तर तर सार्वजनिक असत पण मला वाटत जेव्हा एखादा निर्णय
मनाविरुद्ध घ्यायची वेळ येते तेव्हा खरा संघर्ष आपण अनुभवतो...जेव्हा दोन
पर्याय समोर असतात आणि त्यातील कुठलाही स्वीकारला तरी मनाला फक्त दुःखालाच
सामोर जाव लागत तेव्हा तर ह्याची तीव्रता अधिकच जाणवते. कधी एखादा कठोर
निर्णय घेताना मन बंड करून उठत कारण घेतलेल्या निर्णयात
त्याच्या स्वप्नांची आणि अपेक्षांची होळी असते असे काही निर्णय कायमचे
मनावर खोलवर जखम करून जातात. काही निर्णयाचा जेव्हा पुढे जावून पश्चाताप
होतो तेव्हा इतरांपेक्षा मनाचीच असंख्य दुषणे ऐकून घ्यावी लागतात. एक मात्र
खर आहे बहुतांशी निर्णयाच्या बाबतीत मनाचा कौल नेहमी बरोबर असतो. त्याला
डावलून जेव्हा आपण काही करतो त्या वेळेस आपल्याला नेहमी दुखः, अवहेलना
मिळते.व्यक्तीला ओळखण्यापासून अगदी नात्यात कुठे थांबाव अशा अगदी
महत्वाच्या निर्णयांमध्ये सुद्धा तुमच अंतर्मन तुमचा योग्य सल्लागार होत,
पण नेमक आपण त्याच्या सूचनांच्या विरुद्ध वागतो आणि नंतर पस्तावतो. खर तर
इतरांपेक्षा तुम्हाला खर्या अर्थाने ओळखणार तुमच अंतर्मनच असत जे तुमच सुख ,
दुख , वेदना , आनंद कशात आहे हे योग्य प्रकारे जाणत. परंतु हाच आतला आवाज
अवहेरून आपण इतरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार वागतो आणि तिथेच आयुष्याच गणित
चुकत जात. मनाचे अंदाज सहसा चुकत नाहीत गरज असते ती शांतपणे तो जे सांगतो
ते ऐकायची. अनेक प्रसंगातून उलगडलेली माणस, त्यांचा खरे खोटेपणा तोच
निदर्शनास आणून देतो पण आपण मात्र भावनांची झापड लावून त्या अंतर्मनाचा
आवाज दाबून टाकतो. जेव्हा निर्णय मनाशी समन्वय साधून घेतले जातात तेव्हा
संघर्ष नाही तर समाधानच मिळत पण तेच त्याच्या आवाजाला अवहेरून घेतलेला
निर्णय मात्र पश्चाताप घेऊन येतो. आपल मन आपला शत्रू कधीच नसत म्हणूनच
त्याच्या विरुद्ध जाऊन गोष्टी करताना आपण अनुभवतो तो फक्त आणि फक्त मानसिक
संघर्ष... नाती , तडजोड आणि आत्मसन्मान ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला
खरी दिशा दाखवणार आपल मन ते जितक बलवान तितका आयुष्याचा संघर्ष सुसह्य आणि
आवाक्यात असणारा.…अन्यथा भावनांची आणि पर्यायाने आयुष्याची परवड ठरलेली
असते.
………. मिनल सबनीस
No comments:
Post a Comment
Comment Here