
समाझ्या ओळखीतल्या एक बाई आहेत त्यांना मुल होत नाही म्हणून त्या खूप दुखी आहेत. लाखो रुपये त्यांनी आजपर्यंत ट्रीटमेंटवरती खर्च केलेले आहेत तरीही रीजल्ट शून्य. मी सहज त्यांना "तुम्ही एखाद मुल दत्तक का घेत नाही ? " अस विचारलं तर त्यावर त्या " आपल ते आपल असत. कुणा दुसर्याच मुल स्वतःच म्हणून कस वाढवायचं ? मला नाही पटत " अस म्हणाल्या. विषय तिथेच थांबला परंतु मनात विचार आला जशी तुम्हाला आई म्हणवून घेण्याची गरज आहे तशीच एखाद्या मुलाला आईच्या मायेची गरज असू शकते. दोन समान गरजा एकत्रित आल्या तर दोन जीव सहज सुखी होऊ शकतात परंतु हा माझा दृष्टीकोन त्यांना पटणारा नव्हता. खर तर "आई " ह्या शब्दातच वात्सल्य, प्रेम दडलेलं आहे. आपल्याकडे मातृत्वाचा संबंध हा नेहमीच जन्मदात्री आई हिच्याशीच लावला गेला. परंतु काही वेळेस जेव्हा अस नैसर्गिक मातृत्व लाभत नाही तेव्हा ह्या संकल्पनेला अधिक विस्तारित करायची गरज आहे अस आवर्जून वाटत. " मातृत्व " ही एक अशी भावना आहे तिचा प्रत्यक्ष कुणाला जन्म देण्याशी संबंध नाही. फक्त जन्म देण म्हणजे आई होण नसत. आपल्या मुलांना उत्तम संस्कार देण , त्यांना नैतिक बनवण ही मातृत्वाची खूप मोठी जबाबदारी असते. मी अनेकदा बघते स्वतः आई असलेल्या स्त्रिया इतर मुलांचा दुस्वास करणाऱ्या असतात. दुसर्यांच्या मुलाचं कोड कौतुक करण्याची त्याची वृत्ती पण नसते आईपण ही भावना फक्त स्वतः जन्म दिलेल्या मुलांपुरतीच मर्यादित रहात असेल तर ती संकुचित आहे अस निदान मला तरी वाटत. लाखो रुपये खर्च करायचे , शरीरावर वेगवेगळे प्रयोग करायचे आणि शेवटी निराश व्हायचं ह्याने आपणच आयुष्य अधिक वेदनायुक्त करतो त्यापेक्षा आपल्या प्रमाणेच एखाद्या लहानग्याला आईची गरज असू शकते. असा जीव जगवण आणि वाढवण ह्यासाठी मनातील मातृत्व जिवंत असाव लागत. मला अशा जोडप्यांचा खूप आदर वाटतो ज्यांनी असे निर्णय घेऊन अनेक मुलाचं आयुष्य सावरल आणि आज त्यांची मुल उत्तम नागरिक म्हणून नावारुपास आली.शेवटी आई वडिलांचे संस्कारच मुलांना घडवतात मग जरी ते दुसर्याच असल तरी आपल झाल्यावर ते परकेपण सहज गळून जात. त्या काकी सारख्या अनेक स्त्रिया आज समाजात आहेत त्यांनी ह्या पर्यायाचा विचार करायला काय हरकत आहे ? हा अत्यंत व्यक्तिगत प्रश्न आहे तरीही वाटत सगळ काही मनावर अवलंबून असत... अस नसत तर स्वतः लग्न न करता अनेकांच्या आई झालेल्या सामाजिक कार्यकर्त्या झाल्या नसत्या. शेवटी मातृत्व ही एक उच्च कोटीची भावना आहे ती संकुचित असू नये इतकच
……… मिनल
सबनीस
No comments:
Post a Comment
Comment Here