Pages

12 February 2015

गुलाबाच्या फुला .....



आज सकाळी फेस बुकच अकाऊन्ट उघडल आणि एक अतिशय सुंदर गुलाबाच फुल समोर आल. आज " रोज डे " म्हणून माझ्या एका मैत्रिणीने टाकल होत. ह्या जगात एकही व्यक्ती अशी नाही जिला फुल आवडत नाहीत. फक्त प्रत्येकाची आवड भिन्न. "फुल" ह्या निसर्गाच्या परमोच्च कलाकृतीच्या सौंदर्याचा अविष्कार म्हणजे गुलाबाच फुल. विचार आला गुलाबालाच का बर फुलांचा राजा म्हणतात ? का हेच फुल लोकांनी कुठलीही भावना व्यक्त करण्यासाठी निवडल असेल ? थोडा विचार केल्यावर लक्षात आल गुलाब हे उत्साह , उत्स्फूर्त आणि सकारात्मक आयुष्याच जणू प्रतिक आहे.आयुष्य गुलाबाच्या फुलासारखं असाव. ह्या फुलात आयुष्याच्या सगळ्या भावना, संवेदना व्यक्त आहेत. कोमलता आहे तिथेच कठोरता आहे. हळुवारपणा आहे तिथेच उग्रता ही आहे. आयुष्यही असच संमिश्र असत ना ? काटे आहेत म्हणून गुलाबाच उमलण कधी थांबत नाही की त्याच्या सौंदर्यात न्यूनत्व येत नाही. ह्या काट्यांमुळे उलट त्याला वेगळ सौंदर्य प्राप्त झाल आहे. अनेकदा लोक तुम्हाला अनेक प्रकारे त्रास देतात , तुमचा मानभंग होईल अशा घटना घडतात पण आपण ज्याला इंग्लिश मध्ये "Class" म्हणतो तो कधी सोडू नये, आपली आन बान आणि शान राखून कस जगाव , मातीत मिसळण्याआधी तीच ऋण कस फेडाव हे गुलाबाच फुल शिकवत. म्हणूनच आयुष्याला परिपूर्ण करणाऱ्या मैत्री , आत्मीयता, प्रेम ह्या भावना व्यक्त करण्यासाठी गुलाबाच्या फुलाइतक सुंदर माध्यम असू शकत नाही. प्रेमाची कल्पना तर ह्याच्याशिवाय अपूर्णच आहे. अव्यक्त प्रेम व्यक्त करण्यासाठी , अबोल भावना आपल्या व्यक्तीपर्यंत पोचवण्यासाठी हेच फुल दूत म्हणून काम करत.एकूणच हे गुलाबाच फुल आयुष्याच्या प्रत्येक सुख दुखाच्या प्रसंगात आपल्या सोबत आपल्याही नकळत आपली सोबत करत. कुठल्याही धर्मात अखेरच्या प्रवासातही ह्याच फुलाची सोबत असते. जिथे सुख आहे तिथेच दुखाची जाणीवही असते. जे जन्मास आल ते कधीतरी निरोपही घेत परंतु जे आयुष्य मिळाल ते इतक छान जगाव की सगळ्यांना हेवा वाटावा अस सांगणार हे गुलाबाच फुल आयुष्यभर मनात , विचारात अहर्निश बहरत जावो हीच इच्छा.
…………. मिनल सबनीस

No comments:

Post a Comment

Comment Here