Pages

24 February 2015

प्रेम म्हणजे ........

ऋषी च्या समोर त्याच पहिल प्रेम उभ होत. पण आता ती कुणाची तरी पत्नी होती. त्याच्या मनात सगळ्या आठवणी परत जाग्या झाल्या कारण ती जरी पुढे निघून गेली असली तरी त्या प्रेमाच्या अनेक आठवणी अजूनही त्याच्या मनात रेंगाळत असायच्या. तिच्या नंतर तो कधी कुणाचा झालाच नाही अस म्हणायला हरकत नाही.त्या घटनेनंतर त्याने जे समोर येईल ते स्वीकारायच, व्यक्तिगत आवड निवड काहीच ठेवायची नाही अस धोरण स्वीकारलं होत. त्याच आयुष्य फक्त वर्षांनी पुढे गेल पण तो मात्र आजही तिथेच होता.आज ती समोर आली त्याला बघून तिच्या नजरेत एक परका भाव त्याला दिसला.जशी समोरून आली तशीच ती निघून पण गेली पण ऋषी मात्र आतून विलक्षण दुखावला. त्या क्षणी त्याला त्याने स्नेहाला ज्या पद्धतीने दुखावलं होत त्याची तीव्र जाणीव झाली. स्नेहा त्याची खूप छान मैत्रीण. त्याच्या पहिल्या प्रेम प्रकरणात त्याला जे काही भोगाव लागल त्याची माहिती असूनही त्याच्यावर नितांत प्रेम करणारी.… मैत्री जपताना तिने त्याला ह्या सगळ्यातून सावरायला मदत केली. तिच प्रेम तिने व्यक्त केल पण ऋषी मात्र ते स्वीकारू शकला नाही कारण अजून तो पहिल्या प्रेमाच्या आठवणीतून बाहेरच येऊ पहात नव्हता. त्याला आनंदी ठेवण्याचा, त्याने खुश रहाव त्यासाठी तिने सगळे प्रयत्न करून बघितले पण…शेवटी रिक्त हाताने ती मागे परतली. ह्या क्षणी ऋषीला खर प्रेम म्हणजे नक्की काय ह्या पडलेल्या प्रश्नाचं उत्तर जे स्नेहाने केल होत ते खर प्रेम होत हेच मिळाल. ज्यांच्यासाठी आपण झुरतो त्यांना अनेक वेळा तुमची काहीच किंमत असत नाही. व्यवहारी जगात खर प्रेम कुणी करत नाही अस म्हणताना अस प्रेम आपल्या आयुष्यात येउन निघूनही जात पण आपल्याला ते ओळखता येत नाही आणि दुर्दैव म्हणजे सगळ्यात जास्त आपण त्याच व्यक्तीला दुखावून मोकळे होतो. आपल्या छोट्या छोट्या आनंदासाठी झगडणारी, आपल्या छोट्याशाही गोष्टीची आठवण आवर्जून ठेवणारी, आपला इतिहास कितीही वाईट असला तरी आपला आज स्वीकारणारी व्यक्ती हीच आपली खरी सोबती असते. आपले मूड , स्वप्न , सुख दुख वाटून घेण्यात जिला आनंद मिळतो , जिला तुम्ही दुखी झालेले चालत नाही , तुमच्या दुखाची झळ जिला आधी पोचते अशीच व्यक्ती आपल्यावर खर प्रेम करत असते बाकी असतो तो फक्त आणि फक्त कोरडा व्यवहार.
………मिनल सबनीस


No comments:

Post a Comment

Comment Here