Pages

24 February 2015

नात्यांची समीकरणे !!!



आज पुन्हा एकदा व पु ना वाचण्याची संधी मिळाली. वपुर्झा आणि त्यांची इतर पुस्तक सहज चाळली. त्यातील एक वाक्य आयुष्याच सार थोडक्यात सांगून मोकळ झाल… जे मला मनापासून हेलावून गेल ते म्हणजे " आवडलेलं आणि निवडलेलं यांची ताटातूट म्हणजे "तडजोड"......." आयुष्याच्या प्रत्येक वळणावर हा संघर्ष असतो. लहान असतो तेव्हा जे हव असत ते मिळत पण जसे मोठे होतो जे हव तेच मिळण ह्यातील दरी वाढत जाते. तडजोडी अनेक असतात , कराव्या लागतात परंतु तडजोड ह्या नावाखाली केलेल्या गोष्टींमध्ये आयुष्यभर टोचणी देणारी गोष्ट म्हणजे आयुष्याच्या जोडीदाराच्या निवडीबाबत बाबतीत केलेली तडजोड.…. आपला जोडीदार हा आपल्या आवडीपेक्षा इतरांच्या आवडीने निवडून तीच आपली आवड समजून पुढे जाण. प्रत्येकाच्या मनात आपला भावी जोडीदार कसा असावा ह्याच एक चित्र असत. अनेकदा अशी व्यक्ती आपल्या सहवासात येते आणि आपण सुखावून जातो. विचार जुळतात आणि मुख्य म्हणजे स्वाभाविक मनेही जुळली जातात. आपल सहजीवन कुणाबरोबर छान जाऊ शकत ह्याची मनाला असलेली स्पष्ट जाणीव तुम्हाला त्या व्यक्तीच्या खूप जवळ नेते आणि एका क्षणी जात पात , आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती अशा बाह्य गोष्टीनी तिला मिळवण ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे ह्याची जाणीव होते. तुमच सहजीवनाच स्वप्न एका क्षणात उध्वस्त होत. लग्न ही संस्था दोन घरांना जशी एकत्रित आणते तशीच ती दोन अनुरूप जीवना एकत्र आणणारी ठरली पाहिजे परंतु अस न होता सुखाच्या चुकीच्या व्याख्या स्वीकाराव्या लागतात. व्यवहारी व्यक्ती सगळ काही लौकर स्वीकारून मोकळी होते पण भावनाशील व्यक्ती मात्र पदोपदी एक रितेपण अनुभवते. ज्यांच्यामधे लढायची हिंमत असते ते आपल्या आवडत्या व्यक्तीला जोडीदार म्हणून मिळवतात परंतु जे मनाने खचले जातात ते मात्र परिस्थितीपुढे शरणागती घेऊन आयुष्यभराची तडजोड स्वीकारतात. जे मिळत ते कदाचित कांकणभर सरसही असू शकत पण तरीही मन अतृप्तच रहात…. ही केलेली तडजोड स्वतःवर आणि जोडीदारावर पण अन्याय करणारीच ठरते म्हणून अस वाटत की निदान हा निर्णय घेताना मनाच्या विरोधात कधी घेऊ नये. मनाची स्वीकृती म्हणजे नात्याची स्वीकृती असते नाही का ? अशा नात्यांची समीकरणे व्यवहारापेक्षा मनाच्या आणि भावनांच्या पातळीवरच सोडवावी हे उत्तरं .
……………. मिनल सबनीस

No comments:

Post a Comment

Comment Here