Pages

25 February 2015

स्वच्छंद मोकळा श्वास .

कधी कधी इतरांचे काही अनुभव ऐकल्यावर हसावं की आश्चर्य कराव तेच कळत नाही. माझ्या एका मैत्रिणीला जिच्या लग्नाविषयी प्रयत्न सुरु आहेत तिला नुकताच एका मुलाने नकार दिला आणि कारण म्हणजे तीच व्हाट्स अप आणि फेस बुक वर अकौंट आहे आणि तिला खूप सारे मित्र आणि मैत्रिणी आहेत .त्याला अशा मुलीबरोबर लग्न करायचं नाही. माझी मैत्रीण स्वभावाने मनमिळाऊ आणि हसतमुख आहे आणि त्यामुळे ती जाते तिथे छान माणस जोडली जातात. थोडक्यात स्वभाव सोशल असल्यामुळे तिचा गोतावळाही खूप मोठा आहे. परंतु ह्यामुळे ती पुढे जाऊन संसाराला दुय्यम स्थान देईल दुर्लक्षित करेल अशी भीती त्या मुलाला वाटली आणि त्याने नकार कळवला. तो स्वतः अत्यंत एक्कलकोंडा आणि त्याला थोडीफार माणसांची अलेर्जी आहे अस त्याने तिला सांगितलं. त्याने नकार कळवल्यावर तिला काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळल नाही परंतु कुठेतरी ती सुखावली हे मात्र खर. नात्यामध्ये अशी घुसमट कुणाचीही करण हे सुधृढपणाच नक्कीच लक्षण नाही परंतु त्याने तो नकार वेळेत कळवला त्यासाठी तिने त्याचे आभार मानले खर तर हसून खेळून आयुष्य जगायला मिळण ही एक दुरापास्त गोष्ट असते. तुमचा जोडीदार जितका खेळीमेळीने रहाणारा असतो तितके तुम्ही पण खुश रहाता. सतत उग्र आणि गंभीर चेहरा घेऊनच प्रश्न सुटले जात नाहीत. एखाद्या कोरड्या आणि गंभीर प्रकृतीच्या व्यक्तीबरोबर एखादा दिवस तुम्ही राहू शकता पण अख्ख आयुष्य कस काढणार ? एखाद्याला माणसांची आवड असण, जीवनाच्या प्रत्येक गोष्टीतला आनंद घेऊन जगावस वाटण त्याची वृत्ती असते ह्याचा अर्थ तो थिल्लर, बेजबाबदार आहे असा नक्कीच होत नाही. त्यांना अधिक बंधनात बांधू तर ते तितक्या अधिक चोरट्या वाटा शोधत जातात. हसतमुख आणि सोशल असलेली स्त्री/ पुरुष संसाराकडे दुर्लक्ष करेल अशी भीती अनाठायी आणि तिच्यावर अन्याय करणारी आहे.उलट हौशी जोडीदार असेल तर त्याच्या सकारात्मक उर्जेचा आपल्यालाही फायदाच होतो परंतु अधिकतर ठिकाणी अशा व्यक्तीला नावच ठेवली जातात. अनेकदा त्यांनी जोडलेली माणसच वेळ प्रसंगी तुमच्यासाठी उभी रहातात. शहरात एखाद्या सुशिक्षित , नोकरी करणाऱ्या स्त्रीने घरापुरत मर्यादित राहील पाहिजे , फक्त आणि फक्त घराकडे बघितलं पाहिजे हा अट्टाहास कशासाठी ? तिच मन जितक प्रफुल्लीत राहील तितक ती घराकडे जास्त लक्ष नक्कीच देईल आणि तो विश्वास तुम्ही तिच्यावर ठेवला पाहिजे. अनेक मित्र किवा मैत्रिणी असलेली व्यक्ती थोडीच प्रत्येकासोबत अफेर करत फिरणार आहे.? स्वभावातील मोकळेपणा हा स्वाभाविक भाग असतो जरुरी नाही त्याला अशी नकारत्मक किनार असेल. काही मर्यादेमध्ये आपण नक्कीच छान अस वैयक्तिक आणि शोषल लाईफ जगू शकतो. एकट एकट कुणीच सुखी रहात नाही आणि शहरी जीवनात तर तुम्ही नकळत सगळ्यांशी जोडले जाता मग हे जोडण हा आनंदाचा भाग असेल तर तो जास्त चांगला नाही का ? तुमचे विचार नक्कीच सांगा .
…………मिनल सबनीस


No comments:

Post a Comment

Comment Here