काही
दिवसापूर्वी माझ्या एका मैत्रिणीच्या घरी मी गेले होते. सोसायटी एकदम पौष.
प्रवेश घेतानाच गुदमरायला झाल कारण तिथे झाड नावाची गोष्टच अस्तित्वात
नव्हती. पूर्ण काँक्रिटीकरण केलेलं होत. गाड्या उभ्या होत्या आणि आजूबाजूला
शोभेच्या झाडाच्या कुंड्या.तिच्या घरी गेले.थोडावेळ बसल्यावर सहज लक्ष गेल
तर तिच्या शोकेस मध्ये खुरडलेली झाड (बोन्झाय) होती.दिसायला सुंदर पण
त्यांना बघून मला ते केविलवाणे वाटायला लागले.
तिला तुमच्या सोसायटी मधे एकही झाड का नाही ग ? अस विचारल्यावर तिने असा
काही चेहरा केला आणि म्हणाली " झाड म्हणजे डोक्याला ताप ग . रोज तो
पक्षांचा आवाज , सोसायटी मधे पानांचा फुलांचा कचरा आणि मुख्य म्हणजे माती
असली न की ती वार्याने घरात येते. ग्राउंड फ्लोरला राहणाऱ्या लोकांना खूप
त्रास होतो. म्हणून आम्ही आधीच ठरवलं सोसायटी मधे झाड नकोच." ती बोलत होती
मी ऐकत होते आणि समोर ते केवीलवाण बोन्झाय अधिकच केवीलवाण वाटायला लागल.
खरच आपण कुठल्या मानसिकतेमधे जगत आहोत निसर्ग म्हणजे चैतन्य.....पैसा आला
पण आपण त्याच्यापासूनच दूर गेलो. विकासाच्या नावाखाली निसर्ग रोज गुदमरतो.
प्रचंड वृक्ष अक्षरशः कापून काढले जातात तेव्हा मला रडायला येत. कधी उखडून
तर कधी असिड टाकून त्यांना मारलं जात किती क्रूरता ? त्यांच्यात असलेला जीव
त्याच्या यातना कधी समजून घेणार आपण? झाड ,पान ,फुल ,वेली म्हणजे
प्रत्यक्ष जिवंतपणा. त्यांच्यावर घरटी बांधणारे ते छोटे पक्षी त्यांचाही
संसारच असतो ना ? मग त्या जीवांच्या विषयी आपण कधीच विचार करत नाही. झाली
अडचण कापून काढा , तोडून टाका . आजकाल लहान मुल सुद्धा झाडांवर अत्याचार
करताना बघितली की संस्कारांची कीव करावीशी वाटते. सोसायटी मधे झाड नकोत पण
घरात बोन्झाय हवा. जिवंत फुल नकोत पण फुलांचे फोटो हवेत. कसली ही वृत्ती
आणि मानसिकता? मला वाटत पैसा आणि आधुनिक जीवन शैली ह्यांनी जर सगळ्यात मोठा
तोटा जर कुणाचा झाला असेल तर तो निसर्गाचा. कारण मानवाने स्वतःच्या
comfort साठी त्याचे अक्षरशः लचके तोडले आहेत. खूप खिन्नता वाटते. जुन्या
पिढीच्या लोकांनी ह्या निसर्गाच मोल नक्कीच जाणल होत म्हणून निसर्ग
सुरक्षित राहिला पण नंतरच्या पिढ्यांनी मात्र तो वारसा जपण गरजेच समजल नाही
आणि येणाऱ्या पिढ्यांना ते संस्कारही दिले नाहीत. शेवटी निसर्ग आपला पालक
आहे. तो सुरक्षित राहिला तर आपण सुरक्षित रहाणार. रोज कितीतरी झाड बळी
जातात. एक एक करत अनेक झाडांची कत्तल होते तेव्हा आपल्याला प्राणवायू
देणाऱ्या ह्या मुक्या दात्याच्या जीवाची किंमत आपल्याला काहीच नाही हेच
समोर येत. खूप वाईट आहे हे सगळ
………मिनल सबनीस
………मिनल सबनीस
No comments:
Post a Comment
Comment Here