Pages

03 March 2015

असेन मी , नसेन मी .....

एक सहज सुंदर वाक्य आज वाचनात आल " तुमच्या नसण्याने जर तुमच्या व्यक्तीला फरक पडत नसेल तर तुमच्या असण्यालाही काही अर्थ उरत नाही" ह्या एका वाक्यात तुम्ही स्वतःच्या नात्याच प्रामाणिक विश्लेषण सहज करू शकता. आपली व्यक्ती , आपल प्रेम ह्या सगळ्यात आपण अनेकदा इतके गुरफटून जातो की " खरच तोही /तीही माझ्याशिवाय स्वतःला अपूर्ण समजतो/ समजते का? " हा प्रश्न स्वतःला विचारावा अस कधी वाटत नाही. आपल्याला गरज आहे म्हणजे दुसराही त्याच भावनिक पातळीवर आहे असा गोड गैरसमज आपण करून मोकळे होतो. तुम्ही नसताना तुमची आठवण पण जर त्या व्यक्तीला येत नसेल तर … सोप्या शब्दात सांगायचं तर ती तुम्हाला जर "मिस" करतच नसेल तर तुम्ही तुमची शुध्द फसवणूक करून घेत आहात हे नक्की समजाव. पण हे जेव्हा लक्षात येत तेव्हा आपण पूर्णपणे गुंतलेलो असतो. मग मनाची खोटी समजूत काढण , त्या मागची खोटी कारण देण सुरु होत. त्या व्यक्तीच " बीजी " असण हे असच एक कारण…खर तर आपली सत्य स्वीकारायची तयारी नसते … तुम्ही गुंतलेले असता म्हणून काही काळ आपल्या व्यक्तीपासून दुरावल्यावर तुम्हाला भेटण्याची ओढ असते, भावनिक अस्वस्थता असते पण त्याची छोटीशी झलक तरी तुम्हाला त्यांच्याही वागण्यात दिसून यायला हवी तरच अर्थ असतो. काहींना आपल्या भावना बोलायला आवडत नाहीत परंतु व्यक्ती दूर गेल्यावर तरी निदान " तुझ्याशिवाय करमत नाही" हे शब्द सहज ओठावर यायला हवेत.लाख मोलाचे हे शब्द तुमच त्या व्यक्तीला हव असण दाखवून देतात.एक आहे जीवन कितीही व्यस्त झाल तरी आपल्या व्यक्तीची उणीव जर कुणी सहज घेत असेल तर ती व्यक्ती नात्याविषयी कॅज्युअल दृष्टीकोन ठेवून आहे हे समजून जाव. म्हणूनच नात किती खर आहे , भावना किती आतून आहे हे ओळखण्यासाठी तरी काही काळ दूर राहून बघाव. जर त्या दुराव्यात दुसर्याला आपल्या प्रेमाची उणीव जाणवत राहिली तर ती एक सुखद गोष्टच असते पण जर अस होत नसेल तर मनाला वेळेतच सतर्क करून वास्तवाची स्वीकृती करायला मदत करावी...प्रेम म्हणजे एकमेकांच एकमेकांना हव असण, पूर्ण आकाश जरी तारयांनी भरलेल असल तरी आपल्या ताऱ्याच्या अभावी ते भकास वाटण…तो निखळला तर दुसर्या तार्याचा शोध घेण हा शुध्द व्यवहार असतो ते प्रेम कधीच असू शकत नाही.
……….मिनल सबनीस


No comments:

Post a Comment

Comment Here