सकाळी
सकाळी नेहा स्वभावाप्रमाणे अनिकेतशी भांडली होती. त्याच अस्वस्थतेत त्याने
घर ऑफिससाठी सोडलं. मोबाईल त्या गोंधळात चार्ज करायचा राहिला आणि नेमकी
त्याच दिवशी मुंबई मधे बोंब स्फोट झाल्याची बातमी आली आणि परिसरही तोच जिथे
अनिकेत नोकरी करत होता. नेहा सतत फोन लावत होती पण फोन बंद होता. मनात
असंख्य विचारांनी धुमाकूळ घातला अनिकेतला काही झाल नाही ना ? ह्या विचाराने
तिला रडायला येत होत. आपण सकाळी त्याच्याशी
भांडलो नसतो तर….त्यामुळेच तो चिडून बाहेर पडला. कुठे असेल ? काय झाल असेल
? ऑफिस मधे फोन केल्यावर तो ऑफिसला पोचलाच नाही हे कळल आणि नेहा पुरती
कोलमडली. तिला अनिकेतच्या अनंत आठवणींनी रडायला येऊ लागल. तो किती चांगला
आहे , त्याच्या प्रेमाची जाणीव तिला अधिक होऊ लागली. त्याने आपल्याला किती
सुखी ठेवलं आहे तरी आपण सतत त्याच्यामागे भुणभुण लावत असतो, छोट्या छोट्या
गोष्टींचा कांगावा करत असतो , किती किती चुकलो आपण. खर तर त्याच्या सोबत
सुखाने आणि समाधानाने राहू शकलो असतो पण सुखही बोचत होत आपल्याला. असंख्य
वाईट विचारांमध्ये तिला पदोपदी अनिकेतचा चांगुलपणा आणि स्वतः केलेल्या चुका
आठवत होत्या आणि ती पश्चातापाने होरपळत होती. तितक्यात तिचा मोबाईल वाजला,
अनिकेत फोनवर होता त्याने नेहा काळजी करू नकोस मी सुखरूप आहे अस सांगितलं.
नेहा काहीच बोलली नाही. रात्री अनिकेत घरी आल्यावर तिने त्याला घट्ट मिठी
मारून खूप रडून घेतलं. अनिकेतला कळल नाही परंतु त्या दिवसापासून नेहा
पूर्णतः बदलली ती आजपर्यंत….आपली व्यक्ती जवळ असते तेव्हा तिच्यातले दोष
किती काढू किती नको अस होत. दोघांपैकी एक नेहमीच पडती बाजू घेतो म्हणून नात
टिकल जात. पण हाच त्याचा समजूतदारपणा आपण गृहीत धरतो आणि अनेक वेळा
त्यांना चुकीच, अपमानास्पद वागवून मोकळे होतो. खर तर दोष त्याच्यात नसून
आपल्याच स्वभावात असतो. परंतु त्यांच्या चांगुलपणाची जाणीव होण्यासाठी अशीच
एखादी घटना घडावी लागते.आपल्या व्यक्तीला आपल्या प्रेमाची , सहकार्याची
गरज असताना अनेकदा हा अहंकार मधे का येतो ते कळत नाही . त्याचा चांगुलपणा
आपण कधीच अधोरेखित करत नाही. आपण सुखी असतो कारण ते आपल्याला सांभाळून
घेतात. आपल्या स्वभावातील दोष मोठेपणाने स्वीकारतात, आपल्यावर प्रेम करतात.
वेळ ही गोष्ट खूप वाईट असते. होता होई तो आपल्या माणसांना दुखावू नये.
अनेकदा त्यांच्या अपेक्षा खूप माफक असतात. तुमच थोडस प्रेम, काळजी आणि लक्ष
ह्यावर ते समाधानी रहातात पण आपण इतेक अहंकारी होतो की त्यांनाच ह्या
गोष्टींपासून वंचित ठेवतो. ते दूर गेल्यावर त्यांची किंमत कळण्यापेक्षा ते
आहेत तेव्हाच त्यांचा योग्य सन्मान ठेवावा नाही का ?
...............मिनल
सबनीस
No comments:
Post a Comment
Comment Here