"
तू खूप साधेपणाने विचार करतेस . Be Practical " अस माझी जवळची मैत्रीण मला
नेहमी समजावत असते " मिनू जग कस असायला पाहिजे ह्यापेक्षा ते कस आहे हे
एकदा कळल की तुला त्रास होणार नाही. भावनेपेक्षा व्यवहार हा आजच्या जगात
खूप महत्वाचा असतो. व्यवहारी व्यक्ती कधीच कुणाला स्वार्थाशिवाय शब्द देत
नाही आणि पाळतही नाही च्या विरुद्ध भावूक व्यक्ती तिला दुसर्याची गरज आधी
दिसते आणि स्वतःला कितीही त्रास झाला तरी दिलेला
शब्द ती नेहमी पाळते . पण खर सांगू त्यांची किंमत आजच्या जगात शून्य असते
उलट अशा लोकांच्या भावूकतेचा फायदा घेवून त्यांना फसवणारेच अधिक असतात
म्हणून व्यवहारी जगात व्यवहारी रहाण हाच खरा शहाणपणा ………" तिचा शब्द आणि
शब्द पटत होता. कळत होत की ती जे सांगते त्याचा अनुभव माझ्यासारखी अनेक
भावनाशील लोक घेत असतीलही. पण मनात एक प्रश्न नेहमी येतो की डोक्यात सतत
calculations घेत जगणारे अनेक असतात पण ते सुखी असतात का ? माझ्या एका
मैत्रिणीच्या मित्राने तिला प्रेमाच्या नात्यात फसवल कारण तिचा स्वभाव
अतिशय साधा होता. परंतु ती भावूक असली तरी ती strong होती. त्याच्यासाठी
तिने जे केल त्याविषयी तिला बोलल गेल तेव्हा ती एकच म्हणाली " मी प्रेम केल
आणि १००% प्रामाणिक राहू शकले कारण माझा विश्वास माझ्यावर स्वतःवर होता.
पुढे जावून मी जेव्हा विचार करीन तेव्हा मला हे समाधान शेवटपर्यंत राहील की
मी माझ्या नात्याला पूर्णतः न्याय दिला. दुसरा कसा वागतो हे आपल्या हातात
नसत पण आपण कस असाव हे नक्कीच आपण ठरवू शकतो. निवड चुकली म्हणून आपण चुकीचे
ठरत नाही. त्या व्यक्तीची योग्यता नव्हती म्हणून तो विश्वासघात करू शकला
त्यात दोष माझा नाही " व्यवहार हा नेहमीच कोरडा आणि स्वार्थाने बरबटलेला
असतो. काही लोक नात्यांमध्ये पण हाच भाग करतात. दुसर कुणी मिळेपर्यंत हवा
असलेला विरंगुळा म्हणून काही जण दुसर्यांच्या भावनाशी खेळ करतात आणि
त्यांना अर्धवट सोडून देतात. असा अन्याय एखादी भावूक व्यक्ती कधीच करणार
नाही. मन ही एक भावनिक ओलावा जपणारी गोष्ट आहे तिला रुक्ष करण म्हणजे
कुठेतरी आपल्यातील माणूसपण गमावण असत. जगातील सगळ्यात जास्त आनंद देणाऱ्या
भावना ह्या प्रेम , दया , आपुलकी आणि शांती ह्या आहेत आणि ह्यापैकी
कुठल्याच भावनेचा व्यवहारी तत्वाशी संबंध येत नाही. आजकाल लोक खूप
practical झाली आहेत तितकीच ती एकटी पण झाली आहेत. एकमेकांशी संबंध जोडताना
आधी हेतू समोर येतात. ते साध्य होणारे असतील तर नाती पुढे टिकवली जातात.
पण त्यात कितीसा आनंद असतो, भावनिक संवाद असतो हे ज्याच त्याला माहित.
व्यवहारी जगात भावनांची किंमत कितीही शून्य असली तरी हेच शून्य आयुष्याच
गणित सोडवण्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाची भूमिका बजावत असत. तुमचा स्वभाव
जसा असेल तसेच तुम्ही आयुष्यभर रहाता. आणि जेव्हा तुमच्या मूळ स्वभावाच्या
विरुद्ध तुम्ही वागता तेव्हा तुम्ही कधीच सुखी रहात नाही हे मात्र खर.
……….
मिनल सबनीस
No comments:
Post a Comment
Comment Here