"कुछ
रिश्ते मुनाफा नही देते पर अमीर जरूर बना देते है !" अतिशय साध पण तितकंच
समर्पक वाक्य. आजच जग हे व्यवहारावर चालत. कधी तरी भावनाही महत्वाच्या
असतात हे आजकाल लोकांना आवर्जून सांगाव लागत इतकी लोक व्यवहारी झाली आहेत.
नाती निर्माण करताना पण आपला फायदा किती होईल ह्याचा विचार आधी येतो .
समोरच्या व्यक्ती कडून काही लाभ होण्यासारखं असेल तर कुठलीही तडजोड आपण
करतो. अनेकदा आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी दुसर्यांच्या
भावनांशी, हिताशी खेळण पण गैर वाटत नाही. आयुष्यात काही नाती अशी येण खरच
गरजेच असत जी लौकिक अर्थाने आपल्याला काही देत नाहीत पण अनुभवाने मात्र
संपन्न करून जातात. स्वतःच्या पलीकडे बघण्याची दृष्टी देतात.खर्या प्रेमाच
नात अनेकदा हे असच नात असत अस मला वाटत. आपली व्यक्ती आपल्यासाठी काय करते
ह्याची मीमांसा आपण सहसा करत नाही. ह्या नात्यात गुंतताना आपल्याला काय
मिळेल ह्यापेक्षा आपण काय करू शकतो हा विचार मनात आधी येतो. प्रेम खूप
सकारात्मक बदल आपल्यात घडवत. सामाजिक सेवाभावी नातीपण अशीच
असतात....अपेक्षा विरहीत. कुणालाही अडचणीच्या वेळी केलेली मदत त्या
व्यक्तीच्या मनात आपल्या विषयी जो कृतज्ञ भाव निर्माण करते त्याला तोड
नाही.वस्तुंच समाधान काही काळापुरत टिकत परंतु हे आत्मिक समाधान मात्र शेवट
पर्यंत मनात टिकून रहात. स्वतःपुरत सगळेच बघतात पण त्यातही काही
नात्यांसाठी आणि नात्यांच्या पलीकडे असणाऱ्या माणसांसाठी झटताना मिळणारी
तृप्ती ही वेगळीच असते. स्वार्थ , व्यवहार आणि मी पणा ह्याच्या पलीकडे
असलेल जग आपण त्यांच्यामुळे अनुभवतो. काही मिळो न मिळो एक समृद्ध अनुभवाची
शिदोरी मात्र आयुष्यभरासाठी मिळते. नात्यांमध्ये आलेले अनुभव चांगले असोत
की वाईट जगाची खरी ओळख करून देतात. आपण नेहमीच सगळ्यांचे आभारी राहील
पाहिजे कारण त्यांच्यामुळे आपल्याला जग कळत , आपण स्वतः कळतो. वाईट
गोष्टींमधूनही चांगल आणि चांगल्यातूनही अधिक चांगल शिकलो की आपण एक माणूस
म्हणून अधिकाधिक सक्षम होत जातो हे मात्र खर.
.....मिनल सबनीस
No comments:
Post a Comment
Comment Here