Pages

03 October 2015

माया .

हि माया जीवाला शेवटपर्यंत सुधरु देत नाही...........जसा गाढवावर बसलेला एखादा व्यक्ती गाजराला त्याला दिसेल असे लटकवतो पण त्याला मिलू देत नाही आणि त्या गाजराच्या आशेवर हा गाढव चालत राहतो चालत राहतो चालतच राहतो,मग शेवटी गाढवाला काही गाजर मिलत नाही पण गाढवावर बसलेल्याचे ईप्सीत मात्र साध्य होते ..........तसेच काल हा या जीवावर स्वार होतो,समोर समाधान भेटेल समाधान भेटेल हे मायारुपी गाजर हा लटकवतच ठेवतो,हा जीव बिच्चारा शेवटच्या श्वासापर्यंत यात समाधान मिलेल त्यात समाधान मिलेल या आशेवर जीवनभर गाढव बनून राहतो............आणि रामनामाशिवाय आपले आयुष्य अक्षरशः बरबाद करुन टाकतो............!!

09 June 2015

प्रेमावरती लेखन

प्रेमावरती लेखन म्हणजे प्रत्येकाच्या हळव्या कप्प्यातील आठवणीना केलेला स्पर्श. प्रत्येकाचे विचार येतात आणि वाचताना कुठेतरी ते सारे कळतही जातात. माझ्या जवळच्याच एका मैत्रिणीच्या आयुष्यात घडलेली एक घटना आज मला आवर्जून तुम्हाला सांगावीशी वाटते. तुम्ही सगळेच प्रगल्भ वाचक आहात त्यामुळे त्याचा संवेदनशिलतेने विचार कराल अशी आशा आहे. पत्रकारितेच्या क्लासमधे सखीची ओळख झाली आणि छान मैत्री जुळली. एक दिवस ती खूप टेन्शन मधे वाटली म्हणून तिला विचारल्यावर तिने तिच्या प्रियकराच्या मोबाईल मधे एका मुलीचे आक्षेपार्थ असे फोटो बघितले अस सांगितलं. ती त्या वेळेस फेसबुक वरती लेखन करायची ( ह्या घटनेनंतर तीच लेखन थांबल ते कायमच) तिचा प्रियकर आणि ही मुलगी दोघेही तिच्या मित्र सुचित होते. तिच्या पोस्ट वरती अनेकदा तिच्या कॉमेंट्स असायच्या. ती तिच्या प्रियकराची पण मैत्रीण होती आणि दोघेही एकाच एरिया मधे रहाणारे होते. मागे एकदा तिने सहज छेडल असताना त्याने ती त्याच्या मागे होती अस सहज सांगितलं होत त्यामुळे तिच्या मनात अनेकदा तिच्या प्रतिक्रिया वाचून शंका यायची. परंतु त्याच वागण इतक सहज होत की तिला उगाचच आपण संशय घेतो अस वाटायचं. पण हे फोटो प्रकरण झाल आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने विचारलं तर त्याने खरच मला काहीही माहित नाही अस सांगितलं. त्या अश्लील फोटोंमध्ये त्या मुलीच असण आणि ते फोटो त्याच्या मोबाईल मध्ये सापडण ह्या सगळ्या गोष्टी अस सत्य सुचित करत होत्या की जे स्विकारण कुठल्याही व्यक्तीला मग तो स्त्री असो की पुरुष निव्वळ अशक्य होत्. तिनेही तेच केल जे कुठलीही व्यक्ती करेल. तिचा प्रियकर तिला सांगत होता त्याला काहीच माहिती नाही हे फोटो कुठून कसे आले पण विश्वास ठेवण कठीण होत. त्याचं नात कायमच दुभंगून गेल. ती त्यावेळेस मला म्हणाली होती " मिनू पुरुष हे चंचलच असतात पण मुलींच्या हातात असतात काही गोष्टी. मला आश्चर्य वाटल ते हेच की त्या मुलीला ह्या गोष्टींची लाज कशी वाटली नाही. माझ प्रेम असूनही मी मर्यादा कधीच ओलांडली नाही मग तीच धाडस किती मोठ ग ? तिने अशा पद्धतीने वागून केवढी मोठी चूक केली आहे हे तिला आता कळण शक्य नाही. मी ते फोटो डीलीट केले कारण तिला नसली तरी मला त्याची लाज वाटली आणि कुठेतरी तिची काळजी पण..... वहावत जाऊन मुली अशा चुका कशा करतात की ज्याचे दूरगामी परिणाम विचारात घ्यायची गरज त्यांना वाटत नाही. आधुनिकता म्हणजे निलाजरेपणा नाही ना ? आपण प्रेम केल हे दर्शवण्याची किवा सिद्ध करण्याची ही कुठली पद्धत ? बोल्ड आहोत हे दाखवण्याचा हा मार्ग अवलंबणारी ती मुलगी काय करत होती ते तीच तिला तरी कळत होत का ? खूप धक्का बसला आहे." त्यानंतर तिने लेखन आणि आपल अकौंट दोन्ही बंद केल. खरच प्रेम म्हणजे पावित्र्य , समर्पण, तितिक्षा आणि प्रतीक्षा मग त्यात वासना , अश्लीलता ह्याला स्थान कस असेल ? आजही अशी एखादी घटना वाचली किवा ऐकली की सखीची आठवण हमखास येते आणि.
 ………………. मिनल सबनीस

11 April 2015

आपण आपल्याच व्यक्तीशी खोट का बोलतो ?


एखादी चूक घडल्यावर आपण आपल्याच व्यक्तीशी खोट का बोलतो ह्याचा विचार केला की एक नाही अनेक कारण समोर येतात. अनेकदा खोट बोलण्यामागे प्रमुख कारण असत ते म्हणजे भीती. कधी शिक्षेची तर कधी समोरच्या व्यक्तीच्या नजरेतून उतरण्याची. पण ह्या दोन्हीपेक्षा जास्त भीती असते ते आपल माणूस गमावण्याची. खोट बोलून नाती कधीच जपली जात नाहीत कारण सत्य कधी न कधी उघडकीस येतच आणि मग मोठ्या प्रयासाने जपलेल नात आणि व्यक्ती आपण कायमची गमावून बसतो. खर तर नात्यामध्ये खोट बोलण्याची गरज तेव्हाच पडते जेव्हा तुमचा नात्यावर आणि तुमच्या व्यक्तीवर विश्वास नसतो. मग जर विश्वासच नाही तर ते प्रेम आहे अस समजण हीच मोठी चूक असते. आपल्या व्यक्तीला काही चुका भलेही गंभीर असतील तरी त्या विश्वासात घेऊन सांगायला हव्यात कारण जेव्हा अशा गोष्टी इतरांकडून त्यांना कळतात तेव्हा ते अधिक धक्कादायक असत. चुका प्रत्येकाच्या हातून होतात परंतु त्या चुकांचा परिणाम ज्यांना कालांतराने भोगावा लागतो अशा आपल्या व्यक्तीला सत्यापासून दूर ठेवण म्हणजे तिचा विश्वासघातच असतो. खर तर खोट बोलाव लागेल अशी गोष्ट किवा कृती होण्या आधीच स्वतःला सावरल पाहिजे. आपल्या आयुष्यात अधिक महत्वाच काय आहे ? आपल प्रलोभन की आपल्या व्यक्तीचा विश्वास हे एकदा ठरवलं की विचार आणि कृती दोघेही योग्य दिशेने जातात. मग कधी आपल्या व्यक्तीच्या विश्वासाला तडा दिला म्हणून मनात अपराधेपणा घेऊन जगाव लागत नाही की खोटेपणाची कास धरावी लागत नाही. आपल्या नात्याला आपणच जपल पाहिजे. मोहात पडण्याआधी कुणाच्या तरी विश्वासाची दोरी आपण तोडत आहोत ह्याची जाणीव आधी झाली तर अस घडणार नाही. व्यक्ती जवळ असो की दूर तिचा विश्वास तर आपल्या सोबत आहेच ह्याची संवेदना जागृत ठेवावी म्हणजे कालांतराने पश्चाताप होईल अशी कृती घडणार नाही.
.………… मिनल सबनीस
 
 

23 March 2015

जमा खर्च नात्यांचा


"कुछ रिश्ते मुनाफा नही देते पर अमीर जरूर बना देते है !" अतिशय साध पण तितकंच समर्पक वाक्य. आजच जग हे व्यवहारावर चालत. कधी तरी भावनाही महत्वाच्या असतात हे आजकाल लोकांना आवर्जून सांगाव लागत इतकी लोक व्यवहारी झाली आहेत. नाती निर्माण करताना पण आपला फायदा किती होईल ह्याचा विचार आधी येतो . समोरच्या व्यक्ती कडून काही लाभ होण्यासारखं असेल तर कुठलीही तडजोड आपण करतो. अनेकदा आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी दुसर्यांच्या भावनांशी, हिताशी खेळण पण गैर वाटत नाही. आयुष्यात काही नाती अशी येण खरच गरजेच असत जी लौकिक अर्थाने आपल्याला काही देत नाहीत पण अनुभवाने मात्र संपन्न करून जातात. स्वतःच्या पलीकडे बघण्याची दृष्टी देतात.खर्या प्रेमाच नात अनेकदा हे असच नात असत अस मला वाटत. आपली व्यक्ती आपल्यासाठी काय करते ह्याची मीमांसा आपण सहसा करत नाही. ह्या नात्यात गुंतताना आपल्याला काय मिळेल ह्यापेक्षा आपण काय करू शकतो हा विचार मनात आधी येतो. प्रेम खूप सकारात्मक बदल आपल्यात घडवत. सामाजिक सेवाभावी नातीपण अशीच असतात....अपेक्षा विरहीत. कुणालाही अडचणीच्या वेळी केलेली मदत त्या व्यक्तीच्या मनात आपल्या विषयी जो कृतज्ञ भाव निर्माण करते त्याला तोड नाही.वस्तुंच समाधान काही काळापुरत टिकत परंतु हे आत्मिक समाधान मात्र शेवट पर्यंत मनात टिकून रहात. स्वतःपुरत सगळेच बघतात पण त्यातही काही नात्यांसाठी आणि नात्यांच्या पलीकडे असणाऱ्या माणसांसाठी झटताना मिळणारी तृप्ती ही वेगळीच असते. स्वार्थ , व्यवहार आणि मी पणा ह्याच्या पलीकडे असलेल जग आपण त्यांच्यामुळे अनुभवतो. काही मिळो न मिळो एक समृद्ध अनुभवाची शिदोरी मात्र आयुष्यभरासाठी मिळते. नात्यांमध्ये आलेले अनुभव चांगले असोत की वाईट जगाची खरी ओळख करून देतात. आपण नेहमीच सगळ्यांचे आभारी राहील पाहिजे कारण त्यांच्यामुळे आपल्याला जग कळत , आपण स्वतः कळतो. वाईट गोष्टींमधूनही चांगल आणि चांगल्यातूनही अधिक चांगल शिकलो की आपण एक माणूस म्हणून अधिकाधिक सक्षम होत जातो हे मात्र खर.
 .....मिनल सबनीस

अनुत्तरीत


खर नात कुठल ? हा प्रश्न नेहमीच पडतो. मुख्यत्वे आपल्या हातून एखादी चूक होते आणि समोरची व्यक्ती त्यावर त्याच्या मनात असलेली गरळ ओकून मोकळी होते त्या क्षणा पर्यंत आपण एका भ्रमात वावरत असतो. हेच कशाला आपण एखादी अपेक्षा केल्यावर त्याच आपल्याप्रती वागण आणि दृष्टीकोन दोन्ही बदलला जातो. " तो तुझा प्रश्न आहे " असा एखादा आपला मित्र किवा मैत्रीण जेव्हा आपल्याला सांगते तेव्हा मैत्रीच्या व्याख्येला पुन्हा तपासून बघण्यासाठी गरज निर्माण होते. मैत्रीच्या कितीही कुणी गप्पा मारल्या तरी खर्या मैत्रीची ओळख ही वेळ आल्यावरच होते, तुम्ही सतत दुसर्यासाठी काहीतरी करत रहाता. तुमचे मित्र जेव्हा जेव्हा अपेक्षा करतात तेव्हा तेव्हा स्वतःची गैरसोय होऊनही त्यांना मदतीचा हात तुम्ही पुढे करता.पण हेच मित्र आपण आयुष्याच्या नाजूक काळातून जात असताना इतके परके आणि स्वार्थाने वागून मोकळे होतात की आपला मैत्रीवरचा विश्वास उडून जातो.....अस म्हणतात वाईट वेळ म्हणजे वरदान असते कारण जोवर सगळ आलबेल असत तोपर्यंत सगळेच सोबत असतात परंतु जेव्हा खरी अडचण निर्माण होते तेव्हा नाती स्वतःच्या खर्या स्वरुपात समोर येतात. खर सांगायचं तर वाईट वेळही निघून जाते आणि आपण अडचणीतून बाहेरही येतो पण त्या काळात मिळालेल्या अनुभवातून आपल्याला आपण खूप काही शिकतो. खर नात तेव जिथे आपल्या व्यक्तीचा मग ते कुठल्याही नात्याच्या स्वरुपात असू दे एकदा स्वीकार केला तर फक्त आनंदाच्या नाही तर दुखाच्याही प्रसंगी सुद्धा आपण त्याच्या सोबत रहातो. त्याच्या पडत्या काळात त्याला एकट सोडण्याचा विचारही आपल्या मनात येत नाही. जिथे निव्वळ स्वतःच्या सोयीप्रमाणे केलेली तडजोड नसते ते नात खर असत. तुम्हाला समजून घेणारी व्यक्ती कधीच तुमच्याविषयी चुकीचा समज किवा आकस ठेवत नाही. कधी तो/ ती रागावले तरी त्यानी दिलेल्या अनेक सुखाच्या क्षणांची जाणीव आणि आठवण ठेऊन आपण त्यांना त्याच्या आयुष्याच्या वाईट काळातून बाहेर पाडण्यासाठी मदतच करतो. नात्याच्या मुळाशी प्रेम असेल तरच हे घडू शकत अन्यथा स्वार्थी आणि स्वतःपुरत बघणारी व्यक्ती कधीच कुणाचा आधार होऊ शकत नाही. जे तुमच्या पाठीशी सदैव उभे रहातात तेच तुमचे आपले असतात. काही क्षणाच्या विरंगुळ्यासाठी जोडलेल्या नात्यांकारिता कधीच त्यांना दुखवू नका हेच सांगावस वाटत.
……………मिनल सबनीस